Nagpur Bacchu Kadu Protest : बच्चू कडूंच्या महाएल्गार मोर्चाने नागपूरला घेराव! नागपूरमार्गे जाणारे अनेक रस्ते बंद
कर्जमाफी, सातबारा कोरा आणि शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे संस्थापक व माजी मंत्री बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या महा एल्गार आंदोलनामुळे नागपूरमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलकांच्या मोठ्या संख्येने सिव्हिल लाइन्स परिसरात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान रामगिरी परिसरात कडेकोट बंदोबस्त उभारला आहे.
सामान्यतः संध्याकाळी गजबजणारा वॉकर्स स्ट्रीट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. रामगिरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारून वाहनांची ये-जा रोखण्यात आली असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांना आंदोलक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय (महाल आणि रेशीमबाग) परिसराकडे जाण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने तेथेही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या बंदोबस्ताचा परिणाम म्हणून वर्धा, चंद्रपूर आणि हैदराबादकडून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. बुटीबोरी ते जामठा मार्गावर वाहतूक ठप्प असून, मिहान पुलाजवळ शेतकरी आंदोलनकर्त्यांनी चक्काजाम केला आहे. या आंदोलनात शेतकरी नेता राजू शेट्टी, विजय जावंधीय, माजी मंत्री महादेवराव जानकर आणि रविकांत तुपकर सहभागी झाले आहेत. बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर चालवत मोर्चाचे नेतृत्त्व करत असून, शेतकऱ्यांचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, पुढील काही तास नागपूरसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

