Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला
Balasaheb couldn't bring us together, but Devendra Fadnavis managed to do it. : "महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक क्षण घडला. अनेक वर्षांपासून दुरीवर असलेले ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर एकत्र आले. पण या एकत्र येण्यामागे कोण होता, याचा उलगडा आज खुद्द राज ठाकरे यांनीच केला. भाषणात राज ठाकरे म्हणाले की, "जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीस यांनी जमवलं. आम्हा दोघांना एकत्र आणणं!" त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
हिंदी भाषा लादण्याच्या त्रिभाषा सूत्राच्या विरोधात मराठी अस्मितेसाठी लढताना ठाकरे बंधू एकत्र आले. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत विचारले, "अचानक हिंदी कुठून आलं? कशासाठी हिंदी? कुणासाठी हिंदी? लहान मुलांवर का लादता हिंदी?" शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा न करता, केवळ बहुमताच्या जोरावर निर्णय लादल्याचा आरोप त्यांनी केला. "तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, पण आमची खरी सत्ता रस्त्यावर आहे," असा इशाराही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, "मी दादा भुसे यांना दोन पत्रं दिली. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, 'तुम्ही समजून घ्या.' मी त्यांना सांगितलं, 'तुमचं सगळं ऐकून घेईन, पण मान्य करणार नाही.'" याच त्रिभाषा धोरणाच्या विरोधात आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
वरळी डोम परिसरात झालेल्या या मेळाव्यात शिवसैनिक, मनसैनिक आणि मराठी जनतेचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मराठी अस्मितेसाठी ही एक नवी सुरुवात ठरेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.