CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

राज्यात ७०० ठिकाणी 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरु होणार, CM एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबईतील विकासकामांची पाहणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचाही समाचार घेतला.
Published by :
Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विकासकामांचा पाहणी दौरा सुरु केला आहे. यावेळी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याची पाहणी केली. यावेळी लोकशाहीला प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी मोठी घोषणा केली. राज्यात ७०० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करणार असल्याचं शिंदे म्हणाले.

शिंदे लोकशाहीला प्रतिक्रिया देताना पुढे म्हणाले, "आम्ही एक वेगळी संकल्पना मांडली की, घराजवळ दवाखाना असला पाहिजे. काही लोक रुग्णालयात जायला कंटाळा करतात. अंगावर आजार काढतात. त्यामुळे भविष्यात तो व्यक्ती गंभीर रुग्ण होतो. त्यामुळे मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं. पण आता रुग्णांना कोणत्याही आजाराचा सामना करावा लागला, तर तातडीने मुंबईत या दवाखान्यात दाखल व्हायचं. ठाण्यात याआधीच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला आहे. राजकीय विरोधकांना उत्तर मी देत नाही. त्यांना उपचार घ्यायचे असतील तर मोफत ठेवले आहेत. ज्यांना आमची पोटदुखी आहे, त्यांचाही आजार या रुग्णालयात बरा होईल," असा उपरोधिक टोलाही शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

त्यानंतर दादर येथे विकासकामांची पाहणी करताना शिंदे म्हणाले, " संपूर्ण रस्ते काँक्रिटचे होणार आहेत. आता कोणत्याही कामासाठी रस्ते खोदण्याची गरज नाही. या रस्त्यांवर डक टाकले आहेत. त्यामुळे रस्ता खोदण्याची समस्या येणार नाही. रस्ते चकाचक होतील. फेज वन आणि फेज टू मधून या रस्त्यांचे काम केलं जात आहे. या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. याआधीच्या सरकारच्या काळात रस्ते खराब व्हायचे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com