Dhananjay Munde : बीड महिला विनयभंग प्रकरणी धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! ; SIT नेमण्याची मागणी
Dhananjay Munde Meet Devendra Fadnavis : अल्पवयीन मुलीवरील विनयभंग प्रकरणात सखोल चौकशी व्हावी यासाठी महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक (SIT) नेमावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत करत केली.
या प्रकरणात अनेक धागेदोरे असून, "कोण कुठे होता आणि कोणते फोन कॉल्स झाले?" याची सखोल चौकशी आवश्यक आहे. सीडीआरसोबत आयपीडीआर (IPDR) चेक करणे अत्यावश्यक ठरेल. हे सगळं तपासल्यावरच खरा गुन्हेगार आणि त्याला संरक्षण देणाऱ्यांचा चेहरा समोर येईल, असंही मुंडेंनी स्पष्ट केलं.
प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचे राजकारण तापले
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्यानंतर आलेल्या राजकीय खळबळीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका खासगी कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं असून, या प्रकरणामुळे विविध राजकीय पक्ष, संघटना आणि पालक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचं राजकारण अक्षरशः तापलं आहे. या पार्श्वभूमीवरच मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन SIT नेमण्याची औपचारिक मागणी लेखी स्वरूपात केली आहे.
पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाले, "एका लहान मुलीवर सलग एक वर्ष अत्याचार झाला. या कोचिंग क्लासमध्ये माझ्या भगिनी - मायमाऊलीही जात होती. संबंधित कोचिंगचा मालक आणि त्याचे भागीदार हे सत्ताधाऱ्यांच्या वरदहस्ताखाली आहेत. हे बीड विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी मिळून रचलेले कारस्थान आहे." "हे प्रकरण विधानसभेच्या पटलावर मांडणार आहे. मी कालचा संपूर्ण वृत्तांत मुख्यमंत्र्यांना दिला असून, महिला IPS च्या नेतृत्वात SIT गठीत व्हावी, यासाठी मी लेखी निवेदनही दिलं आहे."
त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, “या प्रकरणात संपूर्ण साखळी, कोण कुठे होता, कोणते फोन कुणाकडे गेले, याचा वेध घेणं गरजेचं आहे. आता हे फक्त CDRपुरतं मर्यादित न राहता IPDRसह तपासलं गेलं पाहिजे. त्यानंतरच खरे आरोपी आणि त्यांच्या पाठीमागचे हात स्पष्ट होतील.”
काय आहे प्रकरण?
बीड शहरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये 'नीट NEET' तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन शिक्षकांविरोधात POSCO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. सध्या या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.
राज्य महिला आयोगाची तत्काळ प्रतिक्रिया
या गंभीर घटनेची दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. "सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, तसेच इतर विद्यार्थिनींच्या तक्रारी असल्यास त्या संपूर्ण संवेदनशीलतेने तपासाव्यात," अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.