Mega Block : रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहाच; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक

Mega Block : रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक पाहाच; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईकरांसाठी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईकरांसाठी रविवारी प्रवासाचे नियोजन करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. कारण रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक प्रस्तावित असून त्यामुळे लोकल रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना उशीर, मार्ग बदल आणि काही लोकल रद्द होण्याचा सामना करावा लागू शकतो.

मुख्य मार्गावरील बदल

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद व अर्ध-जलद लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. या लोकल्स कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.

त्याचप्रमाणे, कल्याणहून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद व अर्ध-जलद लोकल कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. या लोकल्स दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, CSMT आणि दादरहून सुटणाऱ्या डाऊन मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे–कल्याण दरम्यान ५व्या मार्गिकेवरून, तर अप मेल-एक्सप्रेस गाड्या ६व्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावरील वाहतुकीवर परिणाम

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक राहणार आहे.

या कालावधीत CSMT–वाशी–बेलापूर–पनवेल आणि पनवेल–वाशी–CSMT दरम्यान धावणाऱ्या अनेक हार्बर लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत CSMT–कुर्ला आणि पनवेल–वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठाणे–वाशी आणि नेरूळ दरम्यान प्रवासाची विशेष अनुमती देण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com