Smoking : सिगारेट सोडण्याचे फायदे; वयाच्या 40 नंतरही मेंदूला होतो फायदा
“आता वय झालंय, सिगारेट सोडून काही फरक पडणार नाही,” असा समज अनेक धूम्रपान करणाऱ्यांमध्ये आढळतो. मात्र, अलीकडील वैज्ञानिक संशोधनाने हा गैरसमज खोटा ठरवला आहे. 40 किंवा 45 वर्षांनंतरही धूम्रपान सोडल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होते, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात 40 वर्षांवरील हजारो लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सिगारेट सोडलेले आणि अजूनही धूम्रपान करणारे दोन्ही गटांचा समावेश होता. स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता आणि भाषेवरील नियंत्रण अशा विविध चाचण्यांमधून असे दिसून आले की, धूम्रपान सोडलेल्यांची मेंदूची क्षमता अधिक चांगली होती.
धूम्रपान मेंदूचे कसे नुकसान करते?
सिगारेटमधील घातक रसायनांमुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना नुकसान होते. यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि मेंदूच्या पेशी हळूहळू कमजोर होतात. परिणामी स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रता न राहणे आणि विचार करण्याची गती मंदावणे अशा समस्या निर्माण होतात. दीर्घकाळ ही स्थिती राहिल्यास डिमेंशियाचा धोका वाढू शकतो.
धूम्रपानामुळे वाढणारे गंभीर आजार
सिगारेटचा धूर फुफ्फुसातून रक्तात मिसळून संपूर्ण शरीरात पसरतो. यामुळे हृदयरोग, स्ट्रोक, COPD, मधुमेह तसेच फुफ्फुसांचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोका वाढतो. तसेच दृष्टी कमी होणे, श्वसनाचे विकार आणि अकाली मृत्यूचा धोका देखील धूम्रपानामुळे वाढतो.
सिगारेट सोडल्यानंतर शरीरात काय बदल होतात?
धूम्रपान थांबवल्यानंतर शरीर बरे होण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. काही आठवड्यांत रक्ताभिसरण सुधारते, श्वास घेणे सोपे होते आणि थकवा कमी होतो. काही महिन्यांत फुफ्फुसे स्वच्छ होऊ लागतात आणि व्यक्ती अधिक ऊर्जावान वाटू लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मेंदूच्या कार्यक्षमतेत हळूहळू सुधारणा दिसू लागते.
सिगारेट सोडण्यासाठी उशीर कधीच होत नाही
संशोधनातून स्पष्ट झाले आहे की कोणत्याही वयात धूम्रपान सोडल्यास त्याचे सकारात्मक परिणाम शरीरावर दिसतात. “आता काही उपयोग नाही” हा विचारच सर्वात मोठा अडथळा ठरतो. योग्य निर्णय आणि ठाम इच्छाशक्ती असल्यास सिगारेटची सवय सोडणे शक्य आहे.

