Eknath Shinde Borivali Kora Kendra : कोराकेंद्रमध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्दशी संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती
थोडक्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून राज्यातील नागरिकांना शुभेच्छा
गणरायाच्या कृपेने महाराष्ट्रातील सर्व संकटं दूर व्हावीत - शिंदे
दिवाळीच्या पूर्वसंध्येला जीएसटीचे दोन स्लॅब कमी करण्यात आले आहेत - शिंदे
अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांनी मोठ्या श्रद्धा-भक्तीने गणरायाचं विसर्जन केलं. १० दिवस चाललेल्या या उत्सवाचा समारोप भक्तीभावाने झाला. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांना शुभेच्छा देत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मंगलकामना व्यक्त केली.
शिंदे म्हणाले, “गणेश भक्तांनी गेल्या १० दिवसांत मनोभावे बाप्पाची सेवा केली. आज विसर्जनाच्या वेळी आपण सर्वांनी हीच प्रार्थना करावी की गणरायाच्या कृपेने महाराष्ट्रातील सर्व संकटं दूर व्हावीत. आपल्या लाडक्या बहिणी, शेतकरी, बांधव आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला सुख-समृद्धी लाभावी. महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि जनतेच्या जीवनात आनंद नांदावा.”
ते पुढे म्हणाले की, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि राज्यातील सर्व संकटं दूर करून महाराष्ट्राला बळकटी देतील. याचसोबत त्यांनी देशाच्या प्रगतीचा मुद्दा उपस्थित केला. “आज भारत आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे,” असे शिंदे म्हणाले.
यावेळी त्यांनी अलीकडे झालेल्या जीएसटी कपातीचा विशेष उल्लेख केला. “दिवाळीच्या पूर्वसंध्येला जीएसटीचे दोन स्लॅब कमी करण्यात आले आहेत. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल. ही दिवाळीची खास भेट आहे. यासाठी मी पंतप्रधानांचे आभार मानतो,” असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, बोरीवलीतील म कोरा केंद्रात शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठा चातुर्मास व्रत अनुष्ठानाचा भव्य समारोप सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संवाद साधला आणि भाविकांसोबत आनंद व्यक्त केला.