Bharat Gogawale Vs Rashmi Thackeray : "शिवसेनेत जो उठाव झाला तो रश्मी ठाकरेंमुळे" रश्मी ठाकरेंवर गोगावलेंचा गंभीर आरोप
शिवसेनेतील उभी फूट आणि त्यातून कोसळलेले महाविकास आघाडी सरकार हे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरते. या घडामोडी अजूनही अनेकांच्या मनात खोलवर आहेत. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे कोकणातील आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा शिवसेनेतील फुटीबाबत भाष्य करत नवा गौप्यस्फोट केला आहे.
भरत गोगावले म्हणाले, "शिवसेनेतून आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाहेर पडण्यामागे अनेक कारणं होती. पण उद्धव ठाकरे हे एका स्त्रीचे अधिक ऐकत होते. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटमधून बाहेर ठेवायला हवं होतं. पण पक्षातील कार्यकर्त्यांना संधी न देता, घरातील निर्णय लादले गेले." रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी वहिनींच्या हस्तक्षेपाचा उल्लेख केला. पुढे गोगावले म्हणाले, "आम्ही मातोश्रीवर गेलो, तरी आमदारांना तिथे थांबवून ठेवले जायचे, उद्धव ठाकरे भेटत नसत. जेव्हा आमदाराचं काम होत नाही, तेव्हा कार्यकर्त्यांचं कोण ऐकणार? बाळासाहेबांप्रमाणे उद्धवसाहेब नव्हते. बाळासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की खुर्ची मी देणार आणि मीच काढणार."
गोगावले पुढे म्हटले की , "वहिनी पडद्यामागून हस्तक्षेप करत होत्या. उद्धवसाहेबांच्या मनात काही निर्णय असायचे, पण नंतर ते बदलले जायचे." या सर्व अनुभवांमुळेच आम्ही वेगळा मार्ग स्वीकारला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची संधी गमावली, असा टोलाही लगावला.
या आरोपांवर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "आज गोगावले यांना साक्षात्कार होत आहे का? तर मला वाटतं यांचा पॉइंटच चुकला आहे. बाई म्हणून वहिनी राजकारणात लक्ष घालत असतील तर त्याला घराण्याचे संस्कार म्हणावं लागेल. पूर्वी हीच मंडळी रश्मी वहिनींना मध्यस्थीसाठी विनंती करत होती." किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "आदित्य ठाकरे यांनी वयाच्या 14व्या वर्षीपासून पक्षासाठी काम केलं आहे. त्यांच्यात नेतृत्वगुण आहेत. मग त्यांना मंत्रीपद न देण्याचा विरोध का? हा केवळ निष्ठावानांमधील बंडखोरीचा प्रयत्न आहे."
राज-उद्धव भेटीवर भाष्य करत पेडणेकर म्हणाल्या की, "या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ सध्या लावणे योग्य ठरणार नाही, काही वेगळ्या कारणांमुळे ते एकमेकांना भेटले असतील. पुढील घडामोडींचा अंदाज वर्तवण्याआधी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं योग्य आहे."