MNS : महापालिका निवडणुकीच्या तोडांवर मनेसला मोठा धक्का; दोन मोठ्या नेत्यांचा मनसेला रामराम
कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन महिला पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी एकाच वेळी पक्ष सोडल्यामुळे मनसेला या भागात मोठं नुकसान झालं आहे. डोंबिवली येथील मंदा पाटील आणि कल्याणमधील कस्तुरी देसाई यांनी राजीनामा दिला असून, कस्तुरी देसाई यांचे पती आणि मनसेचे नेते कौस्तुभ देसाई यांनीही पक्षाशी संबंध तोडले आहेत.
डोंबिवलीत पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदा पाटील यांनी पक्षातील अंतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला. त्या म्हणाल्या की, घरात कुटुंबीयांचा कार्यक्रम सुरू असताना सोशल मीडियावरून आपल्याला समजलं की, आपल्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. कोणतीही पूर्वकल्पना किंवा चर्चा न करता असा निर्णय घेतल्याने त्या दुखावल्या गेल्या. गेल्या अनेक वर्षांत अत्यंत कठीण परिस्थितीत आपण डोंबिवलीत पक्ष टिकवून ठेवला. निवडणुकीत अपयश आलं तरी पक्षाशी निष्ठा ठेवली, मात्र आता वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कल्याणमध्ये मनसेसाठी सक्रिय असलेले कौस्तुभ देसाई आणि महिला शहराध्यक्ष कस्तुरी देसाई यांनीही पक्षाला निरोप दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, जनतेसाठी काम करताना पक्षात राहून अडचणी येत होत्या. विकासकामांसाठी निधी मिळवणे कठीण होत होते. प्रभागातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर योग्य निर्णय घेण्यासाठी आम्ही पक्ष सोडत आहोत, असं देसाई दाम्पत्याने सांगितलं. तसेच, भाजप आणि शिवसेनेकडून संपर्क झाला असून, पुढील राजकीय वाटचालीबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
थोडक्यात
कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का
मनसेच्या दोन महत्त्वाच्या महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षातून राजीनामा
डोंबिवलीतील मंदा पाटील यांनी पक्ष सोडला
कल्याणमधील कस्तुरी देसाई यांचा मनसेला रामराम
कस्तुरी देसाई यांचे पती व मनसे नेते कौस्तुभ देसाई यांचाही पक्षाशी संबंध संपुष्टात
समर्थकांसह एकाच वेळी राजीनाम्यामुळे मनसेचे स्थानिक पातळीवर नुकसान

