IND vs NZ : न्यूझीलंड मालिकेआधीच टीम इंडियाला मोठा धक्का; ऋषभ पंत दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून (11 जानेवारी) तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र मालिकेतील पहिल्याच सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतीमुळे संपूर्ण वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. वडोदरा येथे होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी ही माहिती समोर आल्याने भारतीय संघाच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरा येथे सराव सत्रादरम्यान ऋषभ पंत फलंदाजीचा सराव करत होता. यावेळी थ्रोडाऊन स्पेशालिस्टने टाकलेला वेगवान चेंडू थेट पंतच्या कंबरेवर लागला. चेंडू लागल्यानंतर पंतला वेदना झाल्या आणि त्याला तत्काळ उपचारासाठी मैदानाबाहेर नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या उजव्या बाजूच्या स्नायूंना दुखापत झाली असून त्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे.
सध्या तरी बीसीसीआयकडून (BCCI) अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. मात्र, पुढील काही तासांत ऋषभ पंतच्या जागी भारतीय संघात कोणाची निवड केली जाणार, याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. पंतच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन किंवा इशान किशन यांना संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून, संघ व्यवस्थापन त्यांच्यापैकी एका खेळाडूवर विश्वास टाकू शकते.
