Local Body Election
Local Body ElectionLocal Body Election

Local Body Election : ठाकरे गटाला धक्का! ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकारणातून एक्झिट

राज्यात नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत असताना ठाकरे गटासमोर मात्र एक मोठी अडचण उभी राहिली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Uddhav Thackeray : राज्यात नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळत असताना ठाकरे गटासमोर मात्र एक मोठी अडचण उभी राहिली आहे. ठाणे शहरात ठाकरे गटाचा महत्त्वाचा चेहरा मानले जाणारे माजी उपमहापौर नरेश मणेरा यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

राजकारण सोडण्यामागचं कारण काय?

नरेश मणेरा यांनी स्पष्टपणे सांगितले की, ठाणे शहरात पक्षाची ताकद सातत्याने कमी होत आहे आणि संघटनाही कमकुवत झाली आहे. या परिस्थितीत कोणतीही पुढील निवडणूक लढवण्यात अर्थ नाही, असा त्यांनी निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाच त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. एकीकडे शिंदे गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागांच्या वाटपावरूनही राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. अशा वातावरणात नरेश मणेरा यांचा राजकीय संन्यास हा ठाकरे गटासाठी धक्कादायक मानला जात आहे.

निष्ठा महत्त्वाची, पक्षांतर नको

दुसऱ्या पक्षात जाण्यापेक्षा राजकारणापासून दूर राहणे अधिक योग्य असल्याचे मत मणेरा यांनी व्यक्त केले आहे. दीर्घकाळ पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या नेत्याने घेतलेल्या या भूमिकेमुळे ठाण्यातील ठाकरे गटाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ठाण्यात ठाकरे गटाची संघटनात्मक स्थिती आणखी कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत असून, मणेरा यांच्या या निर्णयाचे राजकीय परिणाम येत्या काळात स्पष्टपणे दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com