Indian Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा बदल; मंथली पास आता फक्त RailOne अ‍ॅपवरून

Indian Railway : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा बदल; मंथली पास आता फक्त RailOne अ‍ॅपवरून

मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने मंथली लोकल ट्रेन पास बुकिंगची सुविधा UTS on Mobile अ‍ॅपवरून बंद केली
Published on

मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने मंथली लोकल ट्रेन पास बुकिंगची सुविधा UTS on Mobile अ‍ॅपवरून बंद केली असून, आता सर्व नवीन पास बुकिंगसाठी RailOne अ‍ॅपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामागील उद्देश रेल्वेच्या विविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे हा आहे.

प्रवाशांमध्ये गोंधळ

अचानक झालेल्या या बदलामुळे नियमित UTS अ‍ॅप वापरणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना RailOne अ‍ॅपवर नोंदणी कशी करावी, मंथली पास कसा बुक करावा किंवा जुन्या पासचे नूतनीकरण कसे करावे, याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, RailOne अ‍ॅपवरून पास बुकिंगची प्रक्रिया सोपी असून काही स्टेप्स फॉलो केल्यास नवीन पास सहज काढता येतो.

RailOne अ‍ॅपवर पास कसा बुक कराल?

  1. UTS अ‍ॅप ओपन केल्यावर RailOne अ‍ॅप इंस्टॉल करण्याचा संदेश दिसेल.

  2. ‘Download Now’ वर क्लिक करून RailOne अ‍ॅप डाउनलोड करा.

  3. अ‍ॅप ओपन करून ‘Skip’ किंवा ‘Continue’ निवडा.

  4. नवीन यूजर असल्यास मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा.

  5. आधीपासून UTS किंवा Rail Connect यूजर असल्यास संबंधित पर्याय निवडून मोबाईल नंबर व पासवर्ड एंटर करा.

  6. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर 6 अंकी पिन सेट करा.

  7. मुख्य विंडोवर ‘Unreserved’ पर्याय निवडा.

  8. पाससाठी आवश्यक माहिती भरा व पेमेंट पूर्ण करा.

पेमेंट करताना ओळखपत्र निवडणे आवश्यक आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिजिटल पास मोबाईलवर उपलब्ध होतो.

डिजिटल बुकिंगवर सवलत

RailOne अ‍ॅप डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे ३ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. ही ऑफर १४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या कालावधीत लागू असेल. त्यामुळे नियमित प्रवाशांना आर्थिक लाभही मिळणार आहे.

एकत्रित सेवांकडे वाटचाल

रेल्वे प्रशासनाच्या मते, RailOne अ‍ॅपद्वारे अनारक्षित तिकीट, पास बुकिंग, आरक्षण माहिती आणि इतर सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि सेवा अधिक सुलभ होईल.

मुंबई उपनगरीय रेल्वे ही देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारी सेवा असल्याने या बदलाचा परिणाम लाखो प्रवाशांवर होणार आहे. सुरुवातीला गोंधळ असला तरी RailOne अ‍ॅपचा वापर वाढल्यानंतर प्रक्रिया सुलभ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com