GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे
(GST) केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. चार कर स्लॅबची (5%, 12%, 18% व 28%) रचना बदलून ती आता 2 टप्प्यांत आणण्याचा प्रस्ताव मंत्रीगटाने मान्य केला आहे. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी माहिती देताना सांगितले की, 12 व 28 टक्के करस्लॅब रद्द करून त्याऐवजी फक्त 5% आणि 18% दर ठेवले जाणार आहेत. तथापि, अति चैनीच्या आणि ‘घातक’ वस्तूंवर 40% कर लावण्याचाही प्रस्ताव आहे.
दरम्यान, विरोधी पक्षशासित राज्यांनी महसुली तोटा भरून काढण्यासाठी केंद्राने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे. पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी या नव्या व्यवस्थेत राज्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, असे म्हटले आहे.
ग्राहकांच्या दृष्टीने अनेक वस्तू आता 5% स्लॅबमध्ये येण्याची शक्यता आहे. यात सुकामेवा, टूथपेस्ट, साबण, हेअर ऑइल, सामान्य औषधे, प्रक्रिया अन्नपदार्थ, कपडे, बूट, सायकली, स्वयंपाकघरातील भांडी, शेतीची यंत्रसामग्री आणि सोलर वॉटर हिटर यांचा समावेश आहे. तर, सिमेंट, सौंदर्यप्रसाधने, चॉकलेट, टीव्ही, एसी, फ्रीज, टायर, प्लास्टिक वस्तू आदी महागड्या वस्तू आता 18% करस्लॅबमध्ये येणार आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.