IPL Final Match : विमान भाड्यात मोठी वाढ, क्रिकेटप्रेमींची अहमदाबादकडे धाव
सध्या देशभरात IPL च्या अंतिम सामन्याची आतुरता लागून राहील आहे. पंजाब किंग् आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 3 जून रोजी अंतिम सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना होईल. अंतिम फेरीची थीम ऑपरेशन सिंदूर आहे. या कार्यक्रमाला संरक्षणाच्या तिन्ही दलातील प्रमुखांना आमंत्रण देण्यात आलंय. तर, संपूर्ण स्टेडिअमला तिरंग्याची प्रकाशयोजना करण्यात आली आहे. तसंच, शंकर महादेवन याचा लाईव्ह कॉन्सर्टही येथे आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान या सामन्याला जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींची संख्यादेखील अधिक आहे. देशभरातून अनेक क्रिकेटप्रेमी अहमदाबाद येथे दाखल होताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता विमानाच्या तिकीट दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. सोमवारी दिल्ली, बेंगळुरू, मुंबई आणि चंदीगडहून अहमदाबादला येणाऱ्या विमानांचे भाडे 25 हजार रुपयांवर पोहोचले आहे. सामान्य दिवसांमध्ये हे भाडे 3500 ते 5000 रुपयांपर्यंत असते. इतकेच नाही तर अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवार) मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या सकाळच्या विमानांचे भाडे 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. दुपारी 12 वाजण्यापूर्वी बेंगळुरूला एकूण 5 फ्लाइट्स आहेत, त्यापैकी फक्त 2 फ्लाइट्समध्ये काही जागा शिल्लक आहेत. त्यांचे विमान भाडेही 12 हजार रुपयांवरून 30 हजार रुपये झाले आहे.
आयपीएल समारोप समारंभ स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ-हॉटस्टारवर उपलब्ध असेल. तसेच समारंभ किती वाजता सुरू होईल आयपीएलचा समारोप समारंभ सामना टॉस होण्याच्या एक तास आधी सुरू होईल. आयपीएलनुसार, समारोप समारंभ संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल.