Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठी झेप; ठाणे खाडीखालील बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग आला असून आज शिळफाटा ते घणसोली या 4.88 किमी लांबीच्या बोगद्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे करण्यात आलेल्या ‘ब्रेकथ्रू’मुळे ठाणे खाडीखालील बोगद्याचे काम एका मोठ्या टप्प्यावर पोहोचले आहे. या वेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.
न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून तयार करण्यात आलेला हा बोगदा BKC ते शिळफाटा या 21 किमी लांब भूमिगत मार्गाचा भाग आहे. यातील तब्बल 7 किमीचा भाग ठाणे खाडीखाली आहे. एकूण 508 किमी लांबीच्या या मार्गामुळे मुंबई-अहमदाबाद प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
जपानी प्रतिनिधी मंडळाने नुकतीच प्रकल्पाची पाहणी केली. आतापर्यंत 320 किमी लांबीचा व्हायडक्ट तयार झाला असून 17 नद्यांवरील पूल आणि स्थानकांच्या बांधकामालाही वेग आला आहे. पहिला टप्पा सुरत ते बलिमोरा दरम्यान सुरू होईल. 2028 पर्यंत काम ठाण्यापर्यंत आणि 2029 मध्ये BKC पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, प्रवास सुरुवातीला प्रत्येक 30 मिनिटांनी तर नंतर दर 10 मिनिटांनी गाड्या धावतील. त्यामुळे तिकीट रिझर्वेशनची अडचण भासणार नाही. प्रकल्पामुळे ठाणे, वापी, सुरत, बडोदा, आणंद यांसारख्या शहरांना आर्थिक गती मिळणार असून स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ‘आत्मनिर्भर भारत’चे उत्कृष्ट उदाहरण पुढे येईल.