Mumbai local Megablock: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य रेल्वेसह, हार्बर लाईन अन् पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक; लोकल सेवांमध्ये केले 'हे' बदल
मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी 8 डिसेंबर रोजी मुंबईतील मध्य रेल्वेसह, हार्बर लाईन अन् पश्चिम रेल्वे या तिन्ही रेल्वेमार्गावरील लोकल सेवा ठप्प राहणार आहेत त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकांच्या लोकल प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. काही अभियांत्रिकी कामांमुळे प्रवाशांना उद्या अधिक गर्दीचा सामना करावा लागणार आहे. तर यादरम्यान मध्य रेल्वेसह, हार्बर लाईन अन् पश्चिम रेल्वे या तिन्ही रेल्वेमार्गा लोकल सेवांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत, ते पुढील प्रमाणे.
मध्य रेल्वेवरील करण्यात आलेले बदल
मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच या लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावरील करण्यात आलेले बदल
सीएसएमटी ते वाशी, बेलापूर तसेच पनवेलसाठी सुटणाऱ्या अप आणि डाऊन लोकल ब्लॉक कालावधीत रद्द करण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते वांद्रे आणि गोरेगावसाठी अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवाही रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल, कुर्ला, पनवेल दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गावर आणि पश्चिम मार्गावर स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवरील करण्यात आलेले बदल
वसई-विरार मॅरेथॉननिमित्ताने 8 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. यामुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी पहाटे चर्चगेट ते विरारदरम्यान दोन अतिरिक्त विशेष धीम्या लोकल चालविण्यात येणार आहेत. चर्चगेटहून 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2:30 वाजता धीमी लोकल चालविण्यात येईल.
ही लोकल विरारला पहाटे ४:05 वाजता पोहोचेल. यानंतर रात्री 3 वाजता दुसरी विशेष लोकल चालविण्यात येईल. ही लोकल पहाटे 4:35 वाजता विरारला पोहोचेल. या दोन लोकलमुळे मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रवास करणे सोयीचे होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.