GST Cut : कर्करोग उपचारांना मोठा दिलासा! ३३ जीवनरक्षक औषधांवर जीएसटी ‘शून्य
देशातील कर्करोग रुग्णांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. वस्तू व सेवा कर (GST) दरांमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदलांमुळे कर्करोग उपचार आता अधिक परवडणारे होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने कर्करोग उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ३३ जीवनरक्षक औषधांवरील १२ टक्के जीएसटी पूर्णपणे रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधांवर आता ‘शून्य’ जीएसटी लागू होणार आहे.
दिल्लीतील एम्सच्या डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट रोटरी कॅन्सर हॉस्पिटलमधील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागातील डॉ. अभिषेक शंकर आणि शास्त्रज्ञ डॉ. वैभव साहनी यांनी नमूद केले की, या सुधारणांमुळे कर्करोग रुग्णांच्या आर्थिक अडचणींवर मोठ्या प्रमाणात मात करता येईल. अनेक कुटुंबांना उपचारांसाठी मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागत होता; आता त्यात लक्षणीय घट होणार आहे.
याशिवाय दुर्मिळ आजार आणि कर्करोगाच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आणखी तीन महत्त्वाच्या औषधांवरील पाच टक्के जीएसटी देखील शून्यावर आणण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीत काही पेटंट औषधांचाही समावेश आहे, ज्यांना जेनेरिक पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे अत्याधुनिक उपचार अधिक सुलभ होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीत वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींवरील १८ टक्के जीएसटी माफ करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गंभीर आजारांवरील विमा संरक्षण अधिक किफायतशीर होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे तंबाखू उत्पादनांवरील कर ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने हा निर्णय प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून पाहिला जात आहे. सध्या तंबाखू आणि संबंधित उत्पादने २८ टक्के कर स्लॅबमध्ये असली तरी, कर्ज आणि भरपाई उपकर पूर्ण भरल्यानंतर कर वाढ लागू होईल. एकूणच, कर्करोग उपचार अधिक परवडणारे करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
