Ajit Pawr : अजितदादा पवारांना मोठा धक्का ! नागालँड विधानसभेत मोठी राजकीय उलथापालथ

Ajit Pawr : अजितदादा पवारांना मोठा धक्का ! नागालँड विधानसभेत मोठी राजकीय उलथापालथ

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील आमदारांचा NDPP मध्ये प्रवेश, नागालँडमध्ये विरोधीपक्षविरहित सरकारची स्थिती अधिक बळकट
Published by :
Shamal Sawant
Published on

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सात आमदारांनी पक्षाची साथ सोडल्याची बातमी समोर येत आहे. नागालँडच्या राजकारणात ही एक महत्त्वाची घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्व सात आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (NDPP) अधिकृतपणे विलीन झाले आहेत. या विलिनीकरणामुळे ६० सदस्यीय नागालँड विधानसभेत NDPP चं संख्याबळ २५ वरून ३२ वर पोहोचले आहे.

सध्याही नागालँडमध्ये एक ‘विरोधीपक्षविरहित’ सरकार अस्तित्वात आहे. या सरकारला एनसीपी (पूर्वी), एनपीपी, आरपीआय (ए), एलजेपी (आरव्ही), एनपीएफ, जनता दल (युनायटेड) आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे विधानसभेत अधिकृत विरोधी पक्ष अस्तित्वात नाही, ही भारतीय राजकारणात दुर्मीळ बाब मानली जाते.

NDPP मध्ये या विलिनीकरणाची घोषणा वीज व संसदीय कार्यमंत्री तसेच सरकारचे प्रवक्ते के. जी. केन्ये यांनी शनिवारी सायंकाळी कोहिमामधील हॉटेल जापफू येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. केन्ये यांनी स्पष्ट केलं की हे विलिनीकरण संविधानिक तरतुदीनुसार करण्यात आलं असून, याबाबतचा औपचारिक अर्ज विधानसभेचे अध्यक्ष शेअरिंगैन लोंगकुमर यांच्याकडे सादर करण्यात आला होता आणि त्यांनी तो स्वीकारला आहे.

NDPP मध्ये विलीन झालेले NCP आमदार

1. नामरी नचांग (तेनिंग),

2. पिक्टो शोहे (अतोजु),

3. वाय. म्होनबेमो हुम्तसो (व्होखा टाउन),

4. वाय. मंखाओ कोन्याक (मोन टाउन)

5. ए. पोंग्शी फोम (लोंगलेन),

6. पी. लॉंगोन (नोकलक), आणि

7. एस. तोईहो येपथो (सुरुहोटो).

विशेष म्हणजे, एस. तोईहो येपथो हे सध्या नागालँड विधानसभेचे उपसभापती आहेत.

केन्ये यांनी या घडामोडीचे स्वागत करताना सांगितले की, मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या नेतृत्वावर लोकांचा वाढता विश्वास या निर्णयातून दिसून येतो. वाढलेल्या संख्याबळामुळे एनडीपीपी आता अधिक परिणामकारकपणे जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी कार्य करू शकेल, असेही त्यांनी नमूद केले. याआधी नागालँडमधील NCP ने शरद पवार गटातून बाहेर पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला होता, आणि त्यानंतर NDPP मध्ये विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला.

या राजकीय घडामोडीमुळे NDPP चं विधानसभेतील स्थान अधिक बळकट झालं असून, शासनव्यवस्थेच्या स्थिरतेला यामुळे अधिक बळकटी मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com