Social Media Ban : सरकारचं मोठ पाऊल! आता 16 वर्षांखालच्या मुलांना सोशल मीडिया वापरता येणार नाही
तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या प्रमाणात होत असलेला सोशल मीडियाचा वापर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक तसेच मानसिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने मोठे पाऊल उचलले आहे. देशाच्या संसदेने नुकताच एक नवा कायदा मंजूर केला असून १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाते ठेवणे आणि वापर करणे पूर्णपणे बंद राहील. हा नियम १० डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.
या निर्णयाचा थेट प्रभाव जगभर वापरात असलेल्या Facebook, Instagram, TikTok, Snapchat यांसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर पडणार आहे. या कंपन्यांनी कायद्याचे पालन करण्याचे आश्वासन दिले असले, तरी यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीत तांत्रिक आव्हाने उभी राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारी नियम मोडल्यास सोशल मीडिया कंपन्यांवर ४९.५ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. लाखो युजर्सचे वय निश्चित करणे, त्यांची ओळख पडताळणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची खाती बंद करणे हा अतिशय गुंतागुंतीचा आणि वेळखाऊ प्रक्रियेचा भाग असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.
काही तज्ज्ञ आणि उद्योग प्रतिनिधींनी या कायद्याची टीका करताना, अशा बंदीमुळे अल्पवयीन युजर्स अधिक धोकादायक आणि अनियंत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. तसेच हा कायदा अस्पष्ट आणि घाईत तयार झाला असल्याचा आरोपही समोर आला आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाची ऑनलाइन सुरक्षा निरीक्षण संस्था भविष्यात WhatsApp, Twitch, Roblox यांसारख्या इतर लोकप्रिय प्लॅटफॉर्मनाही या नियमांच्या चौकटीत सामावून घेण्याची शक्यता वर्तवते. सोशल मीडियावरील अवलंबित्व कमी करून, मुलांना सुरक्षित डिजिटल वातावरण देण्याचा हा प्रयत्न किती प्रभावी ठरेल? याकडे आता जगभराचे लक्ष लागले आहे.

