BJP canditates first list for loksabha election 2024
BJP canditates first list for loksabha election 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढणार, भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत १६ राज्यांतील १९५ उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय.
Published by :
Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा वाराणसी मतदार संघातून लोकसभेसाठी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर झालंय. भाजपने पहिल्या यादीत १६ राज्यांतील १९५ उमेदवारांची घोषणा केलीय. या यादीत भाजपचे ३४ केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून निवडणूकीला उभे राहणार आहेत. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊ येथून निवडणूक लढवणार असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

माध्यमांशी संवाद साधताना तावडे म्हणाले, पहिल्या यादीत १९५ जागांचा निर्णय झाला आहे. ३४ केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पहिल्या यादीत महिलांसाठी २८ जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहेत. अनुसूचित जमातीसाठी १८ जागा, तर ५० वयोगटाच्या आत असलेले ४७ उमेदवार असणार आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली आहेत. अरुणाचल प्रदेश वेस्ट मंत्री किरण रिजीजू निवडणूक लढवणार असल्याचंही तावडे म्हणाले.

मथुरामधून हेमा मालिनी निवडणूक लढवणार आहे.अमेठीतून स्मृती इराणी निवडणूक लढणार आहे. विदिशामधून शिवराज सिंह चौहान निवडणुकीला उभे राहणार आहेत. गुना मतदार संघातून ज्योतिरादित्य शिंदे उभे राहणार आहेत.कोटातून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना उमेदवरी दिलीय, तर लखनऊमधून राजनाथ सिंह निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. सुष्मा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज नवी दिल्लीतून निवडणूक लढणार असून कृपाशंकर सिंग यांना कौनपूरची जागा देण्यात आलीय. दरम्यान, सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर नारायण राणे यांनी दावा केला आहे. निलेश राणे या मतदार संघातून लढलेले आहेत. आमचा या मतदार संघावर हक्क आहे. असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com