BJP Andolan : भाजपकडून विरोधकांच्या ‘सत्याच्या मोर्च्या’ला मूक आंदोलनातून प्रत्युत्तर
थोडक्यात
विरोधकांच्या ‘सत्याच्या मोर्च्या’ला प्रत्युत्तर म्हणून भाजपने मूक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ हे आंदोलन आज होणार
राज्याचे गृहनिर्माण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.
विरोधकांच्या ‘सत्याच्या मोर्च्या’ला प्रत्युत्तर म्हणून भाजपने मूक आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळ हे आंदोलन आज होणार असून, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील.
विरोधकांकडून सरकारविरोधी हल्लाबोल सुरू असताना, भाजपने शांततामय मार्गाने आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, “सत्याच्या मोर्च्या”च्या नावाखाली सुरू असलेले हे आंदोलन केवळ राजकीय दिखावा असून, राज्य सरकारच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा प्रयत्न आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप “सत्य मौनातून सांगणार” आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.
भाजपच्या मते, राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थिर असून जनतेच्या हिताच्या योजना राबवण्यात व्यस्त आहे. त्यामुळे विरोधकांचे आंदोलन हे जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठीचे प्रयत्न असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे.
गिरगाव चौपाटीवरील या मूक आंदोलनादरम्यान कार्यकर्ते काळ्या पट्ट्या व फलक घेऊन उभे राहतील. “कामगिरी आमची, गोंधळ त्यांचा” अशा आशयाचे फलक या ठिकाणी दिसणार आहेत. भाजपच्या या शांत आंदोलनाने राज्याच्या राजकीय वातावरणात आणखी एक रंग चढण्याची शक्यता आहे.

