BJP Leader Narendra Suryavanshi
BJP Leader Narendra Suryavanshi

कल्याणमधील शिवसेना-भाजप वाद मिटला,भाजप अध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी म्हणाले, "गणपत गायकवाड..."

खासदार श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये भाजपने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेतात,असा दावा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे या भागात भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडली होती.
Published by :

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नुकतीच जाहीर केली. परंतु, या मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचाही बोलबाला आहे. कल्याणमध्ये भाजपने केलेल्या विकासकामांचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे घेतात,असा दावा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यामुळे या भागात भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी पडली होती. मात्र, आता येथील भाजप-शिवसेना वादावर पडदा पडला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की, भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आलं आहे. भाजप व गणपत गायकवाड समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नरेंद्र सुर्यवंशी यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले, कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यात काही गैर नव्हतं. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली, त्यांचं स्वागत आहे.

राज्यात ४५ पार करायचं आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केलं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी बैठक घेतली आणि घोषणा केल्या, म्हणजे ते गुंड होत नाहीत. जो पर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत मतदारसंघ आपल्याला मिळावा, अशी मागणी करणे गैर नाही, असंही सुर्यवंशी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com