भूमीपूजनाच्या फलकावरून भाजपचे आमदार केचे संतापले; शिवीगाळ करत अंगावरही धावले
भूपेश बारंगे|वर्धा: आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांचा एक विडिओ कमालीचा व्हायरल होत आहेय. एका भूमिपूजन कार्यक्रमात आमदार दादाराव केचे यांच्याकडून अपशब्द उद्गारला गेल्याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता राजकारण सुरू झाले असून जलजीवन मिशन या शासकीय योजनेत भूमिपूजन दरम्यान हा प्रसंग उदभवला आहे.
आर्वी विधानसभा मतदार संघात कारंजा तालुक्यातील दानापूर येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. पण यावेळी भूमिपूजन कार्यक्रमात आमदार दादाराव केचे कंत्राटदारावर चांगलेच भडकले आहेय. एकाच स्थळी दोन फलक लावले तरी कसे? असाच प्रश्न उपस्थित करण्यात आला. भूमिपूजन फलक वाचताच आमदार संतापले. पूर्व सूचना न देताच कारभार करीत असल्याचा आरोप कंत्राटदारावर करण्यात आला. यावेळी उपस्थित कंत्राटदाराला विचारणा करताच कंत्राटदाराने उद्धटपणे बोलल्याने आमदार दादाराव केचे भडकताच त्यांची जीभ घसरली आणि आमदार महोदयांच्या श्रीमुखातून अपशब्द देखील काढण्यात आले. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाहीत तर हा प्रकार कुणीतरी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि झपाट्याने तो व्हायरल देखील झाला. यावेळी महिला असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिप सदस्य रेवता धोटे,नीता गजाम, माजी सभापती मंगेश खवशी, भाजप तालुकाध्यक्ष मुकुंद बारंगे,हरिभाऊ धोटे, रोशणा ढोबाळे या देखील तेथे उपस्थित होत्या. यातील वास्तव हे आहे की याच दानापूर गावात जलजीवन मिशनच्या कामाचे भूमिपूजन काँग्रेसच्या गटाने केले होते, त्यामुळे एकाच कामाचे दोन भूमिपूजन फलक आणि त्यात माजी सरपंच राजेंद्र काळे यांचे नाव वगळण्यात आले हे पाहून हा संताप व्यक्त झाला आहे.
या घडलेल्या प्रकाराचा विडिओ व्हायरल झाल्याने आर्वी येथील भाजपच्या गोटात मात्र रोष व्यक्त झाला आहे. आमदार दादाराव केचे यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा काँग्रेसचा डाव असल्याचे म्हटले आहे. येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यावर टीका करीत आपण निधी आणावा आणि मगच भूमिपूजन करावे असेच आव्हान केले आहे.
आमदारांच्या संतापाला कंत्राटदार कारणीभूत
कंत्राटदार यांनी दानापूर गावात जलजीवन मिशन योजनाच्या कामाचे एकाच दिवशी आजी माजी आमदारांचे भूमिपूजन ठेवले.त्याठिकाणी दोन फलक लावले.त्यात माजी सरपंच नाव न टाकल्याने आमदार केचे फटकारले.यावर कंत्राटदार आपली मनमानी करत असताना प्रकरण चिघळले.असे येथील नागरिक सांगत होते.