Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप-शिवसेना युतीची सत्ता

भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून महापौर आणि उपमहापौर पदांवर अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अखेर सत्तावाटपाचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून महापौर आणि उपमहापौर पदांवर अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे समीर राजूरकर यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतली असून, शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ५७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते. या पार्श्वभूमीवर सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती कायम ठेवत महत्त्वाच्या पदांचे वाटप निश्चित करण्यात आले. त्यानुसार महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद शिवसेनेकडे देण्यात आले आहे.

विकासासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार – किशोर शितोळे

भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, निवडणूक प्रक्रियेपासूनच भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण पद्धतीने लढत आहेत. हिंदुत्वाच्या समान भूमिकेवर दोन्ही पक्ष एकत्र आले असून, शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. पाणीपुरवठ्यासह शहराच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप मोठा भाऊ, हे मान्य – विलास पारकर

शिवसेनेचे नेते विलास पारकर यांनी महायुतीतील स्थानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. भाजप हा महायुतीत मोठा भाऊ असून शिवसेना छोटा भाऊ आहे, हे आम्ही मान्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. हिंदुत्व आणि विकासाचे राजकारण हीच आमची दिशा असून, महानगरपालिकेवर कायम भगवा फडकत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोविंद केंद्रे भाजपचे गटनेते

महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने संघटनात्मक पातळीवरही हालचाली वेगात सुरू केल्या. याच पार्श्वभूमीवर ओबीसी प्रवर्गातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रा. गोविंद केंद्रे यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षातील सामाजिक समतोल आणि संघटन बळकटीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

दिग्गज नेत्यांमुळे महापौरपदासाठी रस्सीखेच

छत्रपती संभाजीनगर शहरात मंत्री, खासदार, आमदारांसह अनेक दिग्गज नेत्यांचा प्रभाव आहे. तसेच जालना लोकसभा मतदारसंघातील काही भाग शहरात येत असल्याने तेथील आजी-माजी लोकप्रतिनिधींचाही महापालिकेच्या राजकारणावर प्रभाव दिसून आला. निवडणुकीत विजयी झालेल्या अनेक नगरसेवकांमागे प्रभावी नेत्यांचा पाठिंबा असल्याने महापौरपदासाठी चुरस निर्माण झाली होती. मात्र, अखेर सर्वसमावेशक तोडगा काढत समीर राजूरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप-शिवसेना युतीच्या या सत्तास्थापनेमुळे आता शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, नव्या नेतृत्वाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com