Vijay Kenvadekar PC : 'माझ्या घरात सापडलेले पैसे माझ्या कष्टाचे', विजय केनवडेकर यांना अश्रू अनावर
सावंतवाडीतील भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांनी निलेश राणे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळत त्यांच्या घरी अनधिकृतरीत्या तपास केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. केनवडेकर म्हणाले की, निलेश राणे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट त्यांच्या घरात आले, घराची पाहणी केली आणि बेडरूमपर्यंत गेले. त्या वेळी ते घरी नव्हते; घरात त्यांची वहिनी, पत्नी, वयोवृद्ध आई आणि पुतण्या होते.
“हा प्रकार पूर्णपणे निंदनीय आणि दहशत निर्माण करणारा होता,” असा आरोप त्यांनी केला.
“माझ्या कमाईचा प्रत्येक पै पै नोंदणीकृत”
विवादात असलेल्या रकमेसंदर्भात केनवडेकरांनी स्पष्टीकरण दिले की, ते पैसे ‘केके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’ या त्यांच्या नोंदणीकृत व्यवसायातील आहेत.
त्यांनी सांगितले की रेरा नोंदणी, जीएसटी क्रमांक, बँक व्यवहार आणि बांधकाम कामाशी संबंधित सर्व कागदपत्रे ते सिद्ध करू शकतात.
“निलेश राणे यांनी फोन केला असता तर मी स्वतः घर दाखवले असते”
केनवडेकर म्हणाले,
“निलेश राणे यांच्याकडे माझा फोन नंबर आहे. फक्त फोन करून सांगितलं असतं तर मी स्वतः त्यांना घर दाखवलं असतं. पण अनोळखी माणसे, कॅमेरे घेऊन घरात घुसणे हे किती योग्य?”
भाजपशी निष्ठा कायम -केनवडेकर
आपण 1990 पासून भाजपमध्ये विविध पदांवर काम करत आहोत आणि पुढेही पक्षाशी प्रामाणिक राहणार असल्याचे केनवडेकरांनी स्पष्ट केले.
“मी पक्ष बदलणारा किंवा स्वार्थी कार्यकर्ता नाही. माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी भाजप सोडणार नाही.”
“परिवार दहशतीत, 85 वर्षांच्या आईची तब्येत बिघडली”
या प्रकरणामुळे त्यांच्या घरातील महिलांना आणि वृद्ध आईला मानसिक त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.
“माझा पुतण्या घाबरून रस्त्यावर फिरत होता. हा कोणता लोकप्रतिनिधीचा वागणूक देण्याचा पद्धत आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
राजकारण्यांसोबत संबंध, समाजकार्याची आठवण
भाजप नेते रवींद्र चव्हाण, नारायण राणे, आशिष शेलार यांच्याशी असलेले जुने संबंध त्यांनी सांगितले.
कोकण रेल्वे महामंडळ, एमएसएमई बोर्ड आणि अन्य सामाजिक कामातून 578 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा त्यांनी केला.
“कायदेशीर कारवाई करण्याची तयारी”
अनधिकृत प्रवेशाबाबत ते कायदेशीर पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“माझे 75 वर्षांचे कुटुंब प्रतिष्ठा गमावेल, अशी कोणतीही कृती मी सहन करणार नाही,” असे ते म्हणाले.

