Shiv Sena UBT : ठाकरे गटाला जोरदार धक्का!  पक्षात अनपेक्षित घडामोड

Shiv Sena UBT : ठाकरे गटाला जोरदार धक्का! पक्षात अनपेक्षित घडामोड

मुंबईत शिवसेना ठाकरे गटासाठी अडचणी वाढवणारी घटना समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या एका युवा नेत्याने पक्षाच्या निर्णयाविरोधात पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

BMC Election : मुंबईत शिवसेना ठाकरे गटासाठी अडचणी वाढवणारी घटना समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या एका युवा नेत्याने पक्षाच्या निर्णयाविरोधात पाऊल उचलल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. नेमकं काय घडलं, ते पाहूया.

सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वातावरण तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर होती. ज्या उमेदवारांना पक्षाकडून अधिकृत तिकीट मिळाले, त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, अनेकांना संधी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक पक्षांसमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. अशाच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

मालाडमधून ठाकरे गटाला धक्का

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, मालाड दिंडोशी परिसरातून ठाकरे गटासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटचे मानले जाणारे आणि आमदार सुनील प्रभू यांच्या मतदारसंघातील युवासेनेचे सहसचिव यांनी पक्षाच्या भूमिकेला विरोध करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे.

समृद्ध शिर्केंचा निर्णय

मालाडमधील प्रभाग क्रमांक 43 हा आतापर्यंत ठाकरे गटाचा मजबूत भाग मानला जात होता. मात्र, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यातील आघाडीमुळे हा प्रभाग राष्ट्रवादीकडे गेला. त्यामुळे या भागातून निवडणूक लढवण्याची तयारी करणारे समृद्ध शिर्के नाराज झाले. पक्षाकडून तयारी सुरू ठेवण्याचे संकेत मिळाले होते, पण ऐनवेळी जागा मित्र पक्षाला दिल्याने त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, पक्ष नेतृत्वाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

प्रभाग 43 मध्ये रंगणार तिहेरी सामना

समृद्ध शिर्के यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरल्यामुळे प्रभाग क्रमांक 43 मध्ये आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. या प्रभागात शिर्के, भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात थेट सामना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये या भागातून ठाकरे गटाला आघाडी मिळाली होती. मात्र, प्रभाग मित्र पक्षाकडे गेल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. याच असंतोषातून शिर्केंनी बंडखोरी केली आहे. त्यांनी निवडणुकीत यश मिळवण्याचा आत्मविश्वासही व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com