Ajit Pawar : मातीत जन्म, मातीतच विसावा; अजित पवारांना आज बारामतीत अखेरचा निरोप
गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिलेले कठोर प्रशासक, धडाडीचे नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने मास लीडर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाले. बारामतीजवळील गोजुबावी परिसरात लँडिंगच्या वेळी त्यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळताच प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघातानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. आवश्यक वैद्यकीय व कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर बुधवारी संध्याकाळी त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीची तमाम जनता, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोकाकुल वातावरणात अनेकांचे अश्रू अनावर झाले.
काही तासांनंतर रात्री उशिरा अजित पवार यांचे पार्थिव पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. गुरुवारी सकाळी पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडी येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर रुग्णावाहिकेतून पार्थिव ग. दि. मा. सभागृहापर्यंत नेण्यात येईल. सकाळी ९ वाजता काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात होऊन ती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात समाप्त होईल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात संपूर्ण शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी बारामतीत पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अंत्यविधीसाठी देशभरातील अनेक मान्यवर बारामतीत दाखल होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध पक्षांचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विमानतळावर पोलीस व एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.
