Dehil Blast Update : मोठी अपडेट! दिल्ली स्फोटप्रकरणी 'त्या' गाडीचा मालक पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू
(Dehil Blast Update) दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर तपासाला वेग आला आहे. या स्फोटात वापरलेली ह्युंदाई i20 कार ही सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सलमानला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे. सलमानने चौकशीत सांगितले की, त्याने ही कार काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या व्यक्तीस विकली होती. ही कार HR सिरीजची असून 2014 मध्ये गुरुग्रामच्या पत्त्यावर नोंदणीकृत आहे. पांढऱ्या रंगाच्या या कारमध्ये CNG किट बसवलेले असल्याचे आढळले आहे.
पोलिसांनी RTO कार्यालयातून कारच्या विक्री आणि हस्तांतरणाचे रेकॉर्ड मागवले असून, स्फोटाच्या वेळी गाडी कोणाच्या ताब्यात होती हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी झाला. या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे.
ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या परिसरात नेहमीच मोठी गर्दी असते. मेट्रो स्टेशनच्या बाहेर ऑटो आणि ई-रिक्शा उभे असतात, त्यामुळे हा स्फोट मोठ्या कटकारस्थानाचा भाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या परिसर सील करण्यात आला आहे आणि दिल्ली पोलिस, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि एनआयए तपासात गुंतले आहेत. लाल किल्ला परिसरात उच्च सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

