दिवाळी होणार गोड? अनिल देशमुखांच्या जामिनावर आज CBI न्यायालयाचा फैसला

दिवाळी होणार गोड? अनिल देशमुखांच्या जामिनावर आज CBI न्यायालयाचा फैसला

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणातील जामीनावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल देशमुख 11 महिने तुरुंगात आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणातील जामीनावर आज न्यायालय निर्णय देणार आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी अनिल देशमुख 11 महिने तुरुंगात आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या या जामीनावर न्यायालय काय निर्णय देते यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाकडून आज दुपारपर्यंत निकाल येईल.

देशमुख यांच्या जामीनावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद काल पूर्ण झाला आहे. हायकोर्टानं दिलेल्या निर्देशानंतर अनिल देशमुख यांचा पासपोर्ट काल मुंबई सत्र न्यायालयात जमा करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीने अटक झाली होती. गेल्या अकरा महिन्यांपासून देशमुख कोठडीत आहेत. ईडीसोबतच सीबीआयनेही देशमुखांवरही आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप ठेवला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक लेटबॉम्ब फोडून देशमुखांवर आरोप केले होते. मुंबईतील बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून आपल्याला शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचे टार्गेट देशमुखांनी दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचा आदेश दिला. या चौकशीनंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 'एफआयआर' नोंदवला. या आधारे ईडीनेही अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. कोर्ट या प्रकरणी काय निकाल देणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. सीबीआय कोर्टानेही जामीन मंजूर केल्यास देशमुखांना हा मोठा दिलासा असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com