Anil Ambani : अनिल अंबानींच्या संबंधित सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे
(Anil Ambani) मुंबईत उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीच्या छाप्यानंतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) कारवाई करत सहा ठिकाणांवर छापे टाकले आहेत. सकाळी सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय निवासस्थानी उपस्थित असल्याचे समजते.
येस बँकेकडून घेतलेल्या तब्बल 17 हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप अंबानींवर ठेवण्यात आला आहे. हे कर्ज नियोजित उद्देशाऐवजी इतर कंपन्यांकडे वळवण्यात आल्याचे सांगितले जाते. अंबानी यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तपास अधिकाऱ्यांकडे 10 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र ती मुदत न देता सीबीआयने थेट छापेमारीची कारवाई केली.
या कारवाईदरम्यान तपास यंत्रणेकडून आर्थिक व्यवहाराशी निगडित कागदपत्रे, डिजिटल रेकॉर्ड आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले आहेत. सीबीआयचा दावा आहे की, रिलायन्स ग्रुपच्या विविध कंपन्यांनी कोणतीही ठोस हमी न देता मोठ्या प्रमाणावर कर्जे घेतली आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून निधीचा वापर अन्यत्र केला.
यापूर्वी या प्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे दाखल केले होते आणि त्यानंतर ईडीनेही स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. ताज्या छाप्यांमुळे तपासाच्या दिशेने नवी माहिती आणि पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.