Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर
Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्तGanesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

गणेशोत्सव 2025: मुंबईत 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि ड्रोनची करडी नजर.
Published by :
Team Lokshahi
Published on

मुंबईत यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे.

यासाठी तब्बल १५ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर श्वानपथक, बीडीडीएस, १२ एसआरपी कंपन्या, क्यूआरटी तसेच ११ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने शहरावर सतत नजर ठेवली जाणार आहे. विशेषतः लालबागच्या राजाच्या मंडपासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त करण्यात आला असून, ५०० पेक्षा जास्त पोलिस या ठिकाणी तैनात असतील, अशी माहिती सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

याशिवाय गर्दी नियंत्रणासाठी ४५० मोबाइल व्हॅन आणि ३५० बीट मार्शल यांचा फिरता पहारा राहणार आहे. चौपाटीसह विसर्जन स्थळांवर अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत ७ अतिरिक्त पोलिस आयुक्त, ३६ उपायुक्त, ५१ सहाय्यक पोलिस आयुक्त, २६०० अधिकारी आणि एकूण १५ हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज राहणार आहे.

गणेशभक्तांसाठी ‘नमो एक्सप्रेस’

मुंबईसह कोकणातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून विशेष ‘नमो एक्सप्रेस’ गाडी रवाना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात ही गाडी कोकणातील गणेशभक्तांसाठी हिरवा झेंडा दाखवून सोडण्यात आली.

या गाडीतून सुमारे दोन हजार गणेशभक्त कोकणात रवाना झाले. प्रवाशांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे या प्रवासात केवळ भाजपा कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर इतर पक्षांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनाही अल्प दरात प्रवासाची संधी देण्यात आली आहे.

मंत्री लोढा म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा गणेशभक्तांमध्ये उत्साह अधिक आहे. गणेशभक्तांना प्रवासात कोणताही त्रास होऊ नये यासाठी ही सोय करण्यात आली आहे.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com