Central Railway : लोकलचा खोळंबा संपणार? बदलापूर ते कर्जत दोन नव्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी
Central Railway Badlapur Karjat 3rd 4th Railway Line : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची खबर आहे. आता बदलापूर आणि कर्जतदरम्यान रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाअंतर्गत बदलापूर आणि कर्जत दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका तयार करण्याला मंजुरी दिली आहे. यापूर्वी या प्रकल्पाला आर्थिक मंजुरी मिळाल्यामुळे आता कामाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.
प्रकल्पाचे महत्व
बदलापूर आणि कर्जत दरम्यान ३२.४६ किमी लांबीच्या उपनगरीय मार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. या प्रकल्पामुळे कल्याण परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होईल.
प्रवाशांना होणारा फायदा
तिसरी आणि चौथी मार्गिका तयार होणामुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या स्थानकांवरील प्रवाशांना मोठा आराम मिळणार आहे. सध्या या मार्गावर दोनच रेल्वे मार्गिका असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या जात असताना लोकल गाड्यांना थांबावं लागते, ज्यामुळे प्रवाशांची खूप कोंडी होऊन वेळ वाया जातो. यामुळे लोकल गाड्यांची वाढती फेरीसुद्धा बंद होती. पण तिसरी आणि चौथी मार्गिका मंजूर झाल्याने, प्रवाशांना अधिक गाड्यांची सेवा मिळेल आणि वाहतूक सुलभ होईल.
काम कधी होईल पूर्ण?
या नवीन मार्गिकांमुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीत सुधारणा होईल, तसेच मालवाहतुकीला देखील अडचणी येणार नाहीत. यासाठी काम लवकरच सुरू होईल. भूसंपादन पूर्ण झाल्यावर, तीन ते चार वर्षांमध्ये या कामाची पूर्णता होण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामामुळे कल्याण परिसरातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होईल आणि प्रवास अधिक सोयीचा होईल.
थोडक्यात
• मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी
• बदलापूर–कर्जतदरम्यान रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान आणि सुरळीत
• रेल्वे मंत्रालयाकडून तिसरी व चौथी रेल्वे मार्गिका तयार करण्यास मंजुरी
• मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) अंतर्गत प्रकल्पाचा समावेश
• यापूर्वी प्रकल्पाला आर्थिक मंजुरी मिळालेली
• आर्थिक मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी सुरू होणार

