Maharashtra Weather Update : ऐन दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
थोडक्यात
सर्वत्र पावसाचा इशारा
१३ जिल्ह्यात यलो अलर्ट
कोरड्या आणि उष्ण हवामानाचा जोर कायम राहणार
राज्यात सध्या सर्वत्र दिवाळीमुळे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, मान्सूनच्या वाढलेल्या मुक्कामामुळे आता अनेकांच्या दिवाळीचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हवामानाने सध्याच्या ऑक्टोबर महिन्यात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. आज 19 ऑक्टोबर रोजी राज्याच्या विविध भागांत संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे ऐन दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सर्वत्र पावसाचा इशारा
राज्याच्या पश्चिम किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 19 ऑक्टोबरला विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टी लगत मुंबई, पालघर आणि ठाणे वगळता रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे,
कोल्हापूर, सातारा आणि घाटमाथा परिसरात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही ढगांच्या गडगडाटासह हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा आहे. अहिल्यानगरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. याउलट, विदर्भ आणि मराठवाड्याच्या बहुतांश भागांत कोरड्या आणि उष्ण हवामानाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये उष्णता जाणवेल.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली येथे कोरडे वातावरण राहील. मात्र, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत केवळ हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे.
१३ जिल्ह्यात यलो अलर्ट
रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि जळगाव अशा एकूण १३ जिल्ह्यात यलो अलर्ट वर्तवण्यात आला आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत मान्सून माघारी जात असतो. परंतु यंदा परतीचे दिवस वाढल्यामुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.