Chandrakant Khaire on Raj Uddhav Reunion? : "ठाकरे बंधू एकत्र आले तर, महायुतीला मोठा धक्का बसेल"
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत सध्या राज्यात चर्चांना जोरदार उधाण आले आहे. युतीच्या हालचालींमध्ये आता ठाकरे कुटुंबातील नातेवाईकांचीही मध्यस्थी सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती लोकशाही मराठीला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाही मराठीशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, “आम्ही पक्षाचे पदाधिकारीसुद्धा ठाकरेंनी एकत्र यावं असं मानतो. नातेवाईकांमार्फत संवाद सुरू असल्याची माहिती खरी आहे.”
खैरे पुढे म्हणाले, “माझा पूर्ण विश्वास आहे की ठाकरे बंधू एकत्र आले, तर भाजपा, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीला मोठा धक्का बसेल. मराठवाड्यातूनही जनतेत एकच आवाज उठतो आहे. हे दोघे भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावेत.”
दुसरीकडे, भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र वेगळं मत व्यक्त केलं. “ठाकरे बंधू वेगळे झाले, पुन्हा एकत्र येतीलही. पण यामुळे राजकीय चित्रात फार मोठा बदल होईल असं मला वाटत नाही. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीला यश मिळेल हे निश्चित आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे उत्सुकता वाढली असून आगामी दिवसांत ठाकरे बंधूंमध्ये खरोखरच युती होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.