Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव, धक्काबुक्की अन्...
Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : एक दिवसापूर्वी वादात अडकलेल्या गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील संघर्ष आता अधिक चिघळल्याचे दिसून आले आहे. आज विधानभवनाच्या परिसरात दोन्ही नेत्यांचे समर्थक आमनेसामने आले आणि जोरदार गोंधळ झाला. सकाळच्या सुमारास विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. काही वेळातच ही वादावादी धक्काबुक्की आणि शिवीगाळीत रूपांतरित झाली. सुरक्षारक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जवळपास पाच ते दहा मिनिटे हा गोंधळ सुरू होता.
या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, "संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं, हल्ला कोणी केला. आम्हाला त्याहून अधिक काही सिद्ध करायचं नाही. जर विधिमंडळात गुंडांनाही प्रवेश मिळणार असेल, तर आम्ही आमचे संरक्षण कसे करायचे?"
आव्हाड यांनी आरोप केला की, त्यांच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, शिवीगाळही झाली आणि त्यांच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. "हे सर्व लोक मला मारण्यासाठीच आले होते," असा दावा त्यांनी केला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका होण्याची शक्यता आहे.