Chhagan Bhujbal's big statement on Sunetra Pawar's oath-taking ceremony
Chhagan Bhujbal's big statement on Sunetra Pawar's oath-taking ceremony

Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर छगन भुजबळांचे मोठे विधान, म्हणाले...

आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या शपथविधीबाबत शरद पवार यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
Published by :
Riddhi Vanne
Published on

राज्यातील राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर आता सत्ताकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती परिसरात त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी कोण जबाबदारी स्वीकारणार, यावरून चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी पक्षातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उपमुख्यमंत्रीपदाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली.

आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या शपथविधीबाबत शरद पवार यांनी आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तसेच सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबीयांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सूचित केले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. शरद पवार यांनी यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाची शक्यता व्यक्त केली होती, मात्र सध्याच्या घडामोडींमुळे त्या चर्चांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, “सर्वसामान्य कार्यकर्ते आणि आमदार यांचे मत विचारात घेऊनच निर्णय घेतला आहे. सुनेत्रा ताई यांना उपमुख्यमंत्री करणे हे अतिशय योग्य ठरेल आणि त्याच दिशेने आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे. आमदारांची सहमती, पक्षाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून आज दुपारीच निर्णय अमलात आणला जाईल.”

मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाल्याचे सांगत भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण सहकार्य करत असल्याचेही स्पष्ट केले. “कदाचित आजच राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवून शपथविधी पार पडेल,” असेही त्यांनी सूचित केले. शरद पवार यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, भुजबळ यांनी या विषयावर बोलणे टाळले. “सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे उपमुख्यमंत्रीपद. त्यामुळे ती सूत्रे योग्य पद्धतीने सुनेत्रा ताईंच्या हातात देणे आवश्यक आहे. पुढचा निर्णय त्या स्वतः घेतील,” असे भुजबळ म्हणाले.

थोडक्यात

  1. राज्यातील राजकारणाला हादरवून टाकणारी घटना; सत्ताकारणात वेगवान घडामोडी सुरू

  2. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन

  3. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती परिसरात विमानाचा मोठा अपघात

  4. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली

  5. राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com