Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आज पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी नाशिक जिल्ह्यातील कैलास उगले आणि कल्पना उगले यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेचा बहुमान मिळाला. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेदेखील उपस्थित होते. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणसाठीचा संकल्प केला. तर महाराष्ट्राची काळजी घेण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सद्बुद्धी द्यावी आणि बळीराजाला आनंदाचे क्षण द्यावेत, असं साकडं मुख्यमंत्री फडणवीसांनी विठ्ठलाकडे घातलं. आज एकादशीसाठी पंढरपुरात सुमारे 18 लाख भाविकांची मांदियाळी आहे. याच 15 लाख भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापूजेनंतर एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली.
आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी राज्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली असून वारकरी पवित्र चंद्रभागा नदीत स्नान करून देवाच्या दर्शनाला जात आहेत. यंदा प्रथमच मुख दर्शन रांग सहा ते सात किलोमीटर लांब गेल्याचे समजते. पालकमंत्री जयकुमार गोरे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः वारीच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवून आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स पोस्टवर याबाबतची माहिती दिली असून त्यांनी म्हटले आहे की,
रुप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
बहुता सकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगरु । बापरखुमादेविवरु ॥
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता व कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.