Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीच्या शुभ दिवशी पंढरपूरच्या पवित्र भूमीतून ‘महाराष्ट्रधर्म’ या नव्या पॉडकास्ट मालिकेची घोषणा केली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा, वारीची परंपरा आणि इतिहास यावर भाष्य करणारी ही मालिका 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.
आषाढी वारीच्यानिमित्ताने फडणवीस पंढरपूरात हरिनामाच्या गजरात सहभागी झाले. त्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह टाळ-मृदुंगाचा नाद आणि फुगडीच्या खेळात भक्तिरसात रंग भरला. पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी पारंपरिक पूजा केली आणि लाखो वारकऱ्यांसोबत चंद्रभागेच्या तीरावर उपस्थित राहिले.
या भक्तीमय वातावरणातच त्यांनी त्यांच्या नवीन उपक्रमाची घोषणा केली. 'एक नवी सुरुवात करतोय...', अशा शब्दांत त्यांनी 'महाराष्ट्रधर्म' पॉडकास्टचे संकेत दिले. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये ते म्हणतात,
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता नव्हे तर ध्येयासाठी लढा दिला. ही वारी कोणताही इव्हेंट नाही, ही चालती-बोलती संस्कृती आहे, महाराष्ट्राचा आत्मभिमान जपणारी परंपरा आहे." वारीच्या इतिहासात कितीही परकीय आक्रमणं झाली, तरी ही परंपरा खंडित झाली नाही, याची आठवण फडणवीस यांनी ट्रेलरमध्ये करून दिली आहे. सारांशतः, महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्रधर्म’ या माध्यमातून होणार आहे.