Ahilyanagar Cabinet Meeting : अहिल्यानगर येथील कॅबिनेट बैठकीत घेतले 'हे' महत्त्वाचे निर्णय; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत आज दुपारी बारा वाजता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करून राज्य मंत्री मंडळ बैठकीस सुरुवात झाली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथील चौंडीमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
यादरम्यान चौंडी येथे अहिल्यादेवी होळकरांचे स्मृतीस्थान जतन आणि संवर्धनाकरता 681कोटींची योजना मंजूर केली आहे. तसेच अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार 147 कोटी त्याचसोबत श्री ज्योतिबा मंदिर विकासासाठी 259 कोटी, श्री तुळजा भवानी मंदिर विकासासाठी 1865 कोटी, त्र्यंबकेश्वर विकासासाठी 275 कोटी, श्री माहुरगड विकास 829 कोटी आणि श्री महालक्ष्मी मंदिर विकासासाठी 1445 कोटी अशा प्रकारचा एकूण 5,503 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता देत योजना आखली आहे.
तसेच अहिल्यानगर येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. हे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत घेतले.
त्याचसोबत पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अहिल्यादेवींनी देशात जे कार्य केले, तेच कार्य त्यांच्या त्रिशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून करत आहोत. पुण्यश्लोक अहिल्या देवींचं जीवन आणि कार्य याबद्दल संपुर्ण जगभरात माहिती पोहचली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कर्मशिअल चित्रपट निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एवढचं नाही तर अहिल्यानगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापन करणार. महिला सक्षमीकरणाकरता एक नवीन आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि संस्थांना आदिशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. खास मुलींकरिता आयटीआय तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.