Devendra Fadnavis : नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा दौरा: सिंहस्थ कुंभमेळा कामांना गती, मंत्रिमंडळाची फौज उपस्थित
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली scoll करा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता प्रशासनाने वेग दिला असून, गुरुवारी (ता. १३ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये तब्बल साडेपाच हजार कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याच्या मंत्रिमंडळातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार असून, दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच अर्धा डझन मंत्री या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
यानंतर मुख्यमंत्री त्र्यंबक रोडवरील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करतील. या आधुनिक इमारतीमुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा मुख्य आकर्षण ठरेल ठक्कर डोम येथे होणारा भव्य सोहळा, ज्यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत रस्ते, पूल, घाटांचे पुनर्विकास, स्मार्ट लाईटिंग, पाणी व मलनिस्सारण व्यवस्था, तसेच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिकचे नव्याने सुशोभीकरण यांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून कुंभमेळा हा केवळ धार्मिक नव्हे, तर आर्थिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाचा उत्सव म्हणून साजरा करण्याचा मानस आहे. याच दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकसाठी मोठ्या निधीची तरतूद केली आहे. या कामांमुळे नाशिकच्या विकासाला गती मिळणार असून, भाविकांना आधुनिक आणि स्वच्छ सुविधांचा अनुभव मिळणार आहे.
दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शहरातील विविध लोकप्रतिनिधी, संत-महंत व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही संवाद साधतील. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला असून, पंचवटी व ठक्कर डोम परिसरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे आणि अजित पवार,यांची उपस्थिती या दौऱ्याला विशेष महत्त्व देत आहे. शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी या तिन्ही घटकांच्या एकत्रित नेतृत्वाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना वेग मिळणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाशिककरांसाठी हा दौरा केवळ राजकीयच नव्हे, तर विकासाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ ठरणार आहे.
Summery
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला आता प्रशासनाने वेग दिला
या ऐतिहासिक सोहळ्यास राज्याच्या मंत्रिमंडळातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभणार
दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच अर्धा डझन मंत्री या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

