Maharashtra Cold Wave
Maharashtra Cold Wave

Cold Wave : राज्यात हुडहूडी कायम, पुढच्या 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज

केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये किमान तापमानात अंशत: वाढ नोंदवण्यात आली तरीही गारठा मात्र कायम राहणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, काही भागांमध्ये किमान तापमानात अंशत: वाढ नोंदवण्यात आली तरीही गारठा मात्र कायम राहणार आहे. राज्यात प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम राहील, तर कोकणातही रात्रीच्या वेळी आणि पहाटे गारठा कायम असेल. थंडीचा कडाका मराठवाडा आणि विदर्भासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये वाढून त्याचा परिणाम जनजीवनावर होण्याचा इशारा देण्यात आल्यानं राज्यात येत्या तीन ते चार दिवसांमध्ये आणखी कडाक्याची थंडी पडणार असल्याचं प्राथमिक अंदाजातून स्पष्ट होत आहे. समुद्रावरून येणाऱ्या गार वाऱ्यांमुळं किनारपट्टी भागांमध्ये ही थंडी हुडहूडी भरवून जात आहे.

घाटमाथ्यावर धुक्याची चादर...

प्रचंड धुकं वळणवाटा आणि घाटमाथ्यावर असल्या कारणानं सध्या दृश्यमानतेवर याचा परिणाम होत आहे. हे धुकं दिवस चढेपर्यंत टिकून असल्या कारणानं गारठासुद्धा टिकून राहत आहे. दरम्यान राज्यातील धुळे इथं सर्वात नीचांकी तापमानाची नोंद मागील 24 तासांमध्ये करत 5.3 अंश सेल्सिअस इतका आकडा समोर आला. तर, पुण्यातसुद्धा गारठा चांगलाच वाढल्याचं दिसून आलं. धुळ्यात असणारी ही थंडीच्या लाटेसम स्थिती काही अंशी कमी होणार असली तरीही गारठा इतक्यात पाठ सोडणार नाही हेच स्पष्ट होत आहे. या थंडीचाराज्यात वाढणाऱ्या परिणाम शेती, फळबागा आणि फुलझाड शेतीलासुद्धा होत आहे. मत्स्यव्यवसायावरही थंडीचा परिणाम दिसून येत आहे.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली...

इथे मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे, पालघरमध्येसुद्धा सायंकाळच्या वेळी तापमानात घट होत असून, ती पहाटेपर्यंत कायम राहत आहे. तर, खाडी आणि सागरी किनारपट्टी क्षेत्रांमध्ये वाहणाऱ्या वाऱ्यामध्येसुद्धा गारवा गाणवत आहे. मात्र मुंबई शहरात सध्या वातावरण धुसर असल्यानं हे धुकं आहे की धुरकं? हाच प्रश्न पडत आहे.

मुंबईच्या हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं खालवत असून, बुधवारी शहरातील बहुतांश भागातील हवेचा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत होता. तर, घाटकोपर आणि चेंबूर मध्ये हाच निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत असल्यानं चिंता वाढली. काही दिवसांपूर्वी शहरातील हवा गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाली मात्र, मुंबईतील काही भागांमध्ये रविवारपासून पुन्हा हवा ‘वाईट’ श्रेणीत गेल्याचं दिसून आलं.

उत्तर भारतात वाढणार थंडीचा कडाका...

उत्तर भारतात अतीव उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतरांगांमध्येच हिमवर्षाव होत असून, काही पर्वतराईंमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. नव्यानं सक्रिय होत असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं हे बदल होत असून, उत्तरेकडील मैदानी क्षेत्रांमध्येसुद्धा किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र या आठवड्याअखेरीस पुन्हा एकदा थंडीची लाट उत्तर भारत गारठवण्यास सज्ज असून, हिमाचल आणि काश्मीरच्या खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्यांची दिशा आणि हवामान प्रणालीत बदल न झाल्यास पुढचे तीन ते चार दिवस थंडीचा कडाका आणखी वाढेल आणि देशभरात याचा परिणाम दिसून येईल असा अंदाज आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com