CIDCO House Lottery : नवी मुंबईत परवडणाऱ्या घरांसाठी सिडकोची मोठी घोषणा, लवकरच लॉटरी प्रक्रिया
CIDCO House Lottery : नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घर खरेदीदारांसाठी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सिडकोकडील घरांच्या किमती आता दहा टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांना परवडणाऱ्या दरात घर घेण्याची संधी मिळणार आहे.
यासोबतच पुढील दोन महिन्यांत सिडकोच्या सुमारे १७ हजार घरांसाठी लॉटरी जाहीर केली जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात घर हवे असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात सांगितले की, ही घरे नवी मुंबई परिसरातील खारघर, वाशी, घणसोली, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल येथे आहेत. या सर्व घरांच्या किमती नव्या निर्णयानुसार कमी होणार आहेत. ही योजना ईडब्ल्यूएस आणि एलआयजी गटातील नागरिकांसाठी लागू असणार आहे.
नवी मुंबई परिसर झपाट्याने विकसित होत असल्यामुळे सिडकोच्या या घरांना मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे लॉटरीत सहभागी होण्याची ही योग्य वेळ असल्याचं सांगितलं जात आहे.लॉटरी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याने इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

