CM शिंदे मोदींच्या भेटीसाठी दिल्ली गाठणार; आता 'ऑपरेशन' शिवसेना खासदारांसाठी

CM शिंदे मोदींच्या भेटीसाठी दिल्ली गाठणार; आता 'ऑपरेशन' शिवसेना खासदारांसाठी

CM एकनाथ शिंदे आता शिवसेना खासदारांना घेऊन एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी आज बैठक घेऊन त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ही बाळासाहेबांच्या विचारांची असल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता खासदारांचाही एक मोठा गट एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना खासदारांची भेट घेणार आहेत. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता 40 आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे आता शिवसेना खासदारांना घेऊन एनडीएमध्ये सहभागी होणार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक दणका दिला आहे. संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याच्या हालचाली एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. तर शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. एकनाथ शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय म्हणजे मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी ही कार्यकारणी घोषित करण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com