CM Mamata Banerjee: बंगालला अस्थिर करण्यामागे केंद्र सरकारचा कट! ममता बॅनर्जींचे आरोप, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
बंगालला अस्थिर करण्यामागे केंद्र सरकारची ब्लू प्रिंट असल्याचे मला जाणवत आहे, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. ज्यामुळे राजकीयवर्तूळात खळबळ माजली आहे. केंद्र सरकारने पश्चिम बंगालला अस्थिर करण्याचा कट रचला असून या कटाचा भाग म्हणून सीमा सुरक्षा दलाकडून म्हणजेच बीएसएफ कडून बांगलादेशी घुसखोरांना राज्यात घुसखोरी करण्यासाठी मदत केली जात आहे, असा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
तसेच पुढे त्या म्हणाल्या इस्लामपूर, सिताई, छोपरा आणि इतर सीमावर्ती भागांमधून बांगलादेशी घुसखोरांना बीएसएफकडून घुसखोरी करण्यासाठी मोकळीक दिली जात आहे, अशी माहिती ममता बॅनर्जींना मिळाल्याचं त्या म्हणत आहेत. बीएसएफ लोकांचा छळ करीत आहे आणि राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप देखील ममता बॅनर्जींनी केला आहे.
ज्यामुळे सीमा सुरक्षा दलावर आरोप करणाऱ्या ममता बॅनर्जी या देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, शेजारी बांगलादेशाशी आपले चांगले संबंध आहेत, पश्चिम बंगालचे पोलिस महासंचालक राजीवकुमार यांना ममता बॅनर्जींनी आदेश दिला आहे की, सीमेच्या दोन्ही बाजूंना शांतता राहावी यासाठी घुसखोरांचा ठावठिकाणा शोधून काढा.
तसेच ममता बॅनर्जींच्या या आरोपावर सीमा सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिलं आहे, अशा कुठल्याही कृत्यात बीएसएफ सहभागी नाही असं म्हणत ममता बॅनर्जींचे आरोप सीमा सुरक्षा दलाने फेटाळले आहेत.