Coastal Road Inauguration: प्रजासत्ताकदिनी कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुला होणार
प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत मुंबईकरांना एक खास गिफ्ट मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोडचा पाचवा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. १०.५८ किलोमीटर लांबीचा हा टप्पा असणार आहे. यामुळे अखेर आता मुंबईकरांच्या साधरण ७ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने खुला होणार आहे.
मरीन ड्राइव्ह ते वांद्रे १५ मिनिटांत प्रवास
बहुप्रतिक्षित अशा या कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे आणि वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करता येणं शक्य होणार आहे. मात्र, कोस्टल रोड हा दररोज सकाळी ७ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असेल. तसेच कोस्टल रोडची कनेक्टिवीटी ही वरळी-वांद्रे सी लिंक ते पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि तेथून वेस्टर्न हायवेवरुन मुंबईकरांना थेट मरिन ड्राइव्ह वरून दहिसर गाठता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा बराचसा वेळ वाचणार आहे.
५ टप्प्यांत कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत खुला
पहिला टप्पा- बिंदू माधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राइव्ह अंतर (९.२९ किमी)
दुसरा टप्पा- मरीन ड्राइव्ह ते हाजी अली मार्गे लोटस जंक्शनपर्यंत नॉर्थ लेन (६.२५ किमी)
तिसरा टप्पा- खान अब्दुल गफ्फार खान रोड ते हाजी अली ते वांद्रे-वरळी सी लिंक (३.५ किमी)
चौथा टप्पा- वांद्रे बाजूकडून मरीन ड्राईव्हच्या दिशेने पुढे
पाचवा टप्पा- मरीन ड्राइव्ह ते वांद्रे (१०. ५८ किमी)
कोस्टल रोडचं काम ऑक्टोबर २०१८ मध्ये हाती घेण्यात आलं होतं. कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची डिसेंबर २०२३ ची डेडलाईन हुकली होती. कोस्टल रोडच्या बांधकामाच्या खर्चात ६१ टक्क्यांची वाढ होत ८००० कोटी रुपयांवरून १३००० कोटी रुपयांपर्यंत गेला. अखेरीस आता मुंबईकरांना वांद्रे वरळी सीलिंक, अटल सेतूनंतर आता कोस्टल रोडचं खास गिफ्ट मिळालं आहे.