Weather Alert : थंडी गायब, उकाडा वाढला; देशभरात पावसाची शक्यता

Weather Alert : थंडी गायब, उकाडा वाढला; देशभरात पावसाची शक्यता

कडाक्याच्या थंडीने ओळखला जाणारा हिवाळा हळूहळू राज्यातून गायब होत असून, त्याजागी उकाडा आणि ढगाळ वातावरणाने हजेरी लावली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कडाक्याच्या थंडीने ओळखला जाणारा हिवाळा हळूहळू राज्यातून गायब होत असून, त्याजागी उकाडा आणि ढगाळ वातावरणाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी, पाऊस आणि उकाडा असे तिन्ही ऋतू एकाच वेळी अनुभवायला मिळत आहेत. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कायम होता, मात्र १ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र आहे.

राज्यात थंडी कमी होत असताना उकाडा मात्र वाढू लागल्याचे संकेत आहेत. अनेक भागांत दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्याचबरोबर दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवामानातील या अचानक बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. सर्दी, ताप, खोकला आणि श्वसनविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासोबतच मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरांमधील वाढते वायू प्रदूषण ही गंभीर समस्या कायम आहे.

दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील भागात मात्र थंडीचा जोर अद्याप कायम आहे. हरियाणाच्या हिस्सारमध्ये देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तेथे किमान तापमान ४.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. महाराष्ट्रात धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तेथे तापमान १०.४ अंश सेल्सिअस होते. तर रत्नागिरीमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून, तेथे कमाल तापमान ३४.८ अंश सेल्सिअस इतके होते. आज दिवसभरात राज्यातील विविध भागांमध्ये तापमानात चढ-उतार पाहायला मिळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ५, ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा मोठा अलर्ट जारी केला आहे. मॉन्सून संपल्यानंतरही पावसाची सरी सुरूच असल्याचे चित्र असून, विशेषतः दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. केरळमध्ये सध्या पावसाची स्थिती कायम असून, तामिळनाडूसाठी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ५, ६ आणि ७ फेब्रुवारी या कालावधीत तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्येही या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, पुद्दुचेरी, रायलसीमा आणि माहे या भागांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत थंडी, काही ठिकाणी उकाडा तर काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस अशी संमिश्र हवामानस्थिती सध्या देशभरात पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून, अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पावसाचा इशारा असलेल्या भागांमध्ये प्रवास करताना आणि शेतीविषयक कामांमध्ये दक्षता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com