Donald Trump : UN मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गडबडगोंधळ; मंचावर जाताना एस्केलेटर बंद, बोलायला गेले अन् टेलीप्रॉम्प्टर बिघडला
थोडक्यात
डोनाल्ड ट्रम्प यांची जागतिक संस्थेवर उपरोधिक टीका
उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांची सोशल मीडियावर प्रतिक्रिया
भारत-पाकिस्तानमधील संघर्ष संपविल्याचा दावा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना या जागतिक संस्थेवर उपरोधिक टीका केली. भाषणाच्या सुरुवातीला टेलिप्रम्प्टर नीट न चालल्यामुळे त्यांनी स्वतःला टेलिप्रोम्प्टरशिवायही बोलण्याची तयारी असल्याचे सांगितले. “हा टेलिप्रोम्प्टर चालवणाऱ्याची मात्र खैर नाही,” असे त्यांनी हसत म्हटले. त्यानंतर ट्रम्प यांनी भाषणाची छापील प्रत वाचली.
दरम्यान ट्रम्प एस्कलेटर वरून मुख्यालयात जात असताना एस्कलेटर अचानक थांबले होते. ट्रम्प यांनी पायऱ्या चढत मिश्किलपणे जिना चढला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्षांच्या पथकातीलच कुणीतरी एस्कलेटरच्या पुढे धावत गेल्याने अपघाताने स्टॉप मेकॅनिझम सुरू झाला आणि एस्कलेटर बंद पडले.
या प्रसंगावर उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांनी प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर लिहिले की, “टेलिप्रोम्प्टर नसतानाही ट्रम्प यांनी स्पष्ट आणि सुसंगत परराष्ट्र धोरण मांडले. अशी बुद्धी असलेळे राष्ट्राध्यक्ष मिळणे खूप महत्त्वाचे आहे.”
भाषणात ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “संयुक्त राष्ट्रांकडे प्रचंड क्षमता आहे, पण ती सध्या वाया जात आहे. इथून मला काय मिळाले तर ते म्हणजे वाईट टेलिप्रोम्प्टर आणि वाईट एस्कलेटर एवढेच.”
यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष संपविल्याचा दावा पुन्हा मांडला. “सात महिन्यांच्या कालावधीत मी सात अशा युद्धांचा अंत केला, जी कधीच थांबणार नाहीत असे मानले जात होते. काही युद्धे 31 वर्षे, एक युद्ध 36 वर्षे, तर आणखी एक 28 वर्षे सुरू होते,” असे ट्रम्प म्हणाले.
मे महिन्यात ट्रम्प यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते की अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये तातडीचा युद्धविराम लागू झाला आहे. त्यानंतर त्यांनी हा दावा अनेकदा पुढे मांडला आहे. भाषणाचा शेवट करताना ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांचे कौतुक करण्याऐवजी उपरोधात्मक शैलीत सांगितले की, “संयुक्त राष्ट्रांकडून मला फक्त वाईट एस्कलेटर आणि वाईट टेलिपप्रोम्प्टर मिळाले आहे.”