Congress : ‘मनरेगा बचाव’साठी काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

Congress : ‘मनरेगा बचाव’साठी काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) वाचवण्यासाठी काँग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. येत्या ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ ही मोहीम देशभर राबवली जाणार असून, केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, मनरेगा ही केवळ एक सरकारी योजना नसून भारतीय संविधानाने दिलेला कामाचा मूलभूत अधिकार आहे. ग्रामीण भागातील मजूर, शेतकरी आणि गरिबांच्या रोजगार, मजुरी, सन्मान आणि वेळेवर निधी मिळण्याच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस एकजुटीने संघर्ष करणार आहे. केंद्र सरकारने मनरेगा रद्द करून ‘विकसित भारत जी राम जी’ हा नवीन कायदा आणल्याचा आरोप करत काँग्रेसने या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खरगे म्हणाले, “मनरेगामधून महात्मा गांधींचे नाव पुसण्याचा आणि मजुरांच्या अधिकारांना खैरातीत बदलण्याचा प्रत्येक कट काँग्रेस लोकशाही मार्गाने हाणून पाडेल.” मनरेगा वाचवण्यासाठी गावोगावी, तालुक्यांत आणि जिल्ह्यांत आवाज बुलंद करण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत सांगितले की, “मनरेगा ही हक्कांवर आधारित योजना होती. या योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांना किमान रोजगार मिळत होता. मात्र आता रोजगाराच्या अधिकारांवर थेट हल्ला केला जात आहे.” त्यांनी असेही नमूद केले की, केंद्र सरकार राज्यांकडून मनरेगासाठी निधी घेत असून, यामुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे. आर्थिक आणि सत्तेचे केंद्रीकरण वाढत असून, याचा सर्वात मोठा फटका गरिबांना बसणार आहे.

काँग्रेसच्या मते, मनरेगा कमकुवत झाल्यास ग्रामीण बेरोजगारी वाढेल, स्थलांतर वाढेल आणि गरिबांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होईल. त्यामुळे हा केवळ राजकीय मुद्दा नसून सामाजिक न्याय आणि लोकांच्या हक्कांचा प्रश्न आहे. ‘मनरेगा बचाव’ आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस सरकारवर दबाव आणणार असून, गरिबांच्या बाजूने लढा अधिक तीव्र केला जाईल, असा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com