Sanjay Shirsat : “मनासारखं आरक्षण नसलं की काँग्रेस घोटाळा ओरडते”, शिरसाटांचा पलटवार
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील महापौरपदाच्या आरक्षण सोडतीपासून ते महायुती, विरोधकांचे आरोप, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांपर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
महापौर आरक्षण सोडतीवर स्पष्टीकरण
राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत योग्य प्रक्रियेनुसार पार पडल्याचे संजय शिरसाट यांनी ठामपणे सांगितले. ही सोडत सर्वांसमोर आणि पारदर्शक पद्धतीने झाली असून, ज्यांना आक्षेप घ्यायचा होता त्यांनी त्या वेळी तो घेतला होता. त्यामुळे आता आरक्षणावर संशय उपस्थित करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जे आरक्षण ठरले आहे त्यानुसारच महापौर बसतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरक्षणावर घेतलेल्या आक्षेपांवर शिरसाट यांनी जोरदार टीका केली. “मनासारखं आरक्षण निघालं नाही की घोटाळ्याचा आरोप करायचा, ही काँग्रेसची जुनी सवय आहे,” असा टोला त्यांनी लगावला. जर आरक्षण आधीच फिक्स असते, तर कल्याण-डोंबिवलीला एसटी आणि ठाण्याला एससी आरक्षण कसे निघाले असते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रत्येक समाजाला न्याय देण्याची ही घटनात्मक प्रक्रिया असून, तिचा सन्मान सर्वांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.
अमरावतीतील भाजप-एमआयएम युतीवर नाराजी
अमरावतीत भाजप आणि एमआयएम एकत्र येण्याच्या चर्चांवर संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशी युती झाल्यास ती मतदारांचा अपमान ठरेल आणि हिंदुत्वाच्या भूमिकेला छेद देणारी ठरेल, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळात अशी युती रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.
मनसे, उबाठा आणि संजय राऊत यांच्यावर टीका
कल्याणच्या राजकारणावर बोलताना शिरसाट म्हणाले की, मनसेची भूमिका ही विकासाभिमुख असून त्यांचे समर्थन स्वागतार्ह आहे. मात्र उबाठा गटाला यातून पोटदुखी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “स्वतः वेळ आली की भेटीगाठी करायच्या आणि इतरांनी केल्या की टीका करायची, हे योग्य नाही,” असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्या “भाजपासोबत जाऊ पण शिंदेंसोबत नाही” या भूमिकेवर टीका करताना त्यांनी म्हटले की, आता राऊत यांना इतर पक्षांच्या दारात जावे लागत आहे, हेच त्यांच्या राजकारणाची स्थिती दर्शवते.
स्थानिक निवडणुका आणि महायुती
जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना शिरसाट यांनी सांगितले की, काही ठिकाणी मतभेद असले तरी महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील. किरकोळ नाराजी ही निवडणूक प्रक्रियेचा भाग असून वरिष्ठ पातळीवर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
थोडक्यात
• राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत पार पडली.
• ही सोडत योग्य प्रक्रियेनुसार झाल्याचे संजय शिरसाट यांचे ठाम मत..
• आरक्षण सोडत सर्वांसमोर आणि पारदर्शक पद्धतीने झाली.
• आक्षेप घ्यायचा असल्यास त्या वेळीच संधी उपलब्ध होती, असे स्पष्ट..
• आता आरक्षणावर संशय उपस्थित करणे योग्य नाही, असा इशारा...

