Ajit Pawar News : जळगावमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षासह शेकडो कार्यकर्तेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आला आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.
आज जळगावमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या पक्षप्रवेशाचा भव्य सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाला मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार असून, जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्तेही यावेळी पक्षप्रवेश करणार आहेत.
प्रतिभा शिंदेंच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा बळ मिळणार असल्याचे चित्र आहे. “दररोज जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मजबूत होत आहे आणि ती ताकद आम्ही प्रत्यक्षात उतरवणार आहोत,” असे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला मोठा धक्का
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपला राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सोपवला होता. राजीनामा पत्रात त्यांनी विशेष उल्लेख केला नसला तरी, काँग्रेस सोडताना त्यांनी जिल्हास्तरापासून राज्यस्तरावरील नेत्यांवर पक्षातील गोंधळ व जबाबदारी न पेलल्याचा गंभीर आरोप केला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.
आगामी निवडणुकांचे चित्र
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महायुती की स्वबळावर, यावरून राजकारण रंगत आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, “स्वबळावर की महायुतीतून लढायचे, याबाबत अंतिम निर्णय आमचे नेते एकत्र बसून नीतीनुसार घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही कार्य करू,” असे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नमूद केले.
प्रतिभा शिंदेंच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील आगामी निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून, काँग्रेससमोर संघटनात्मक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मात्र या प्रवेशामुळे नवीन ऊर्जा व ताकद मिळाल्याचे दिसून येत आहे.